NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

दयाळा एवढे द्यावे, रंग न फुलाचे जावे - प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी

नांदेड ग्रंथोत्सवामध्ये रंगली काव्यमैफल


नांदेड (अनिल मादसवार) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव-2017 मध्ये सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.


किनवट येथील डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी प्रारंभी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील पोवाडा गाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सिंधुताईचे जीवनपट या पोवडयातून उलगडून दाखविला. भगवान अंजनीकर यांनी "दबलेला" आवाज, मनोज बोरगांवकर यांनी सादर केलेले "आत्महत्येपूर्वीचे स्वगत" रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. पूजा डकरे यांनी " क्षणक्षण आयुष्य " या कविताव्दारे आयुष्यात घडणाऱ्या घटनांची मांडणी केली. अशोक कुबडे यांनी "पत्र शेवटचे लिहीते आई" ही कविता तसेच अनिकेत कुलकर्णी या त्यांच्या सुरेल स्वरात गायीलेली गजल दाद मिळवून गेली. प्रा. रविचंद्र हडसनकर यांची "एक कविता गावाकडची" सर्वांना गावाकडील निखळ वातावरणात घेऊन गेली. महेश मोरे यांची "डिजीटल व्हिलेज ", देविदास फुलारी यांची "आम्ही आहोत ऑनलाईन" ही सुखद हास्य फुलवून गेली. काव्यमैफलीचे सूत्रसंचालक बापू दासरी  यांची "बापू म्हणे कचरा गेला" ही गजल तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी "अस्पर्शित ग्रंथाची व्यथा" ही कविता सादर केली. शेवटी काव्यमैफलीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी "कधीही नष्ट न होणारी जात ", "पुतळयाचे मनोगत" व "दयाळा" या कवितेतून "दयाळा एवढे दान द्यावे, रंग न फुलाचे जावे" ही कविता सादर करुन काव्यमैफलीचा अविस्मरणीय समारोप केला.

ग्रंथोत्सवात कथाकथनाने आणली रंगत

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेडच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव-2017 मध्ये डॉ. जगदीश कदम यांचे अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला यात डॉ. नागनाथ पाटील, प्रा. नारायण शिंदे, प्रा. रविचंद्र हडसनकर, प्रा. शंभुनाथ कहाळेकर व डॉ. शंकर विभूते यांनी कथा सादर केल्या.

प्रा. शिंदे यांनी "मोठी माय" या कथेतून मोठी आई, तिच्याशी असलेले नातेसंबंध, मोठया आईची बिडीच्या व्यसनाची वाईट सवय व त्यातून तिचा झालेला दु:खद अंत व याचा मोठया वडीलांना बसलेला धक्का या कथेतून मांडून श्रोत्यांना भावनाविवश केले. प्रा. कहाळेकर यांनी विज्ञानकथा सादर करुन उपस्थितांच्या मनातील विज्ञानविषयीचे कुतूहल जागृत केले. प्रा. हडसनकर यांनी सादर केली "आईसकांडी" ही कथा सर्वांना खळखळून  हसवून गेली. या कथेत आईसकांडीसाठी मुलगा काय काय उपदव्याप करतो याचे अस्सल ग्रामीण चित्र प्रा. हडसनकर यांनी हुबेहुब साभिनय रंगविले. डॉ. विभूते यांनी आपल्या "आमदार गणप्या" या कथेतून एका भन्नाट युवकाची जीवनकथा भन्नाट पध्दतीने मांडून श्रोत्यांना मनमुराद हसविले. डॉ.नागनाथ पाटील यांनी "बाजार" या कथेतून गावाकडील बाजाराचे चित्रण उभे करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. कथाकथनाचे अध्यक्ष डॉ. कदम यांनी "मुडदे'' या कथेतून धिसाडी समाजाची व्यथा आपल्या हदयस्पर्शी सादरीकरणातून सादर केली. कथेतील पत्नीची घालमेल,पतीविषयीची तिची काळजी व समाजातील वाईट नजर असलेल्या नराधमांबाबतची तिची कठोर पाऊले याबाबत डॉ. कदम यांनी सुरेख व मार्मिक मांडणी केली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी तर आभार राजेंद्र हंबिरे यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा