NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

कोस्टा क्रूझच्या पहिल्या फेरीचे पर्यटन मंत्र्यांनी केले स्वागत

क्रूझ पर्यटनाला मुंबईतून मिळणार मोठी चालना

मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) मुंबई हे महाराष्ट्रासह देशाचे क्रूझ पर्यटनाचे (समुद्र पर्यटन) केंद्र ठरत असून जगातील नामांकित अशा कोस्टा क्रूझ कंपनीने चालू सिझनमधल्या पहिल्या क्रूझची सुरुवात मुंबईहून केली. मुंबई-कोचीन-मालदिव या मार्गाने जाणाऱ्या क्रूझचा शुभारंभ आणि स्वागत राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे करण्यात आले. अवघ्या २९ हजार ८०० रुपयात मुंबई ते कोचीन दरम्यान डोमेस्टिक क्रूझचा आनंद
मिळवून देणाऱ्या या क्रूझची पहिली फेरी येत्या रविवारी निघणार आहे. चालू सिझनमध्ये मार्च २०१८ पर्यंत मुंबईतून दर पंधरा दिवसांनी एक क्रूझ निघणार आहे.

क्रुझ पर्यटनातून ३५ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन

पर्यटन मंत्री श्री. रावल यावेळी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने क्रूझ पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीनेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोस्टा क्रूझ कंपनीसोबत समन्वय केला आहे. या कंपनीच्या पहिल्या डोमेस्टिक क्रूझचा आज शुभारंभ करण्यात येत आहे. क्रूझमधून भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येणार असून या पर्यटनातून भारतात दरवर्षी साधारण ३५ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन येण्याचा अंदाज आहे. मुंबई हे क्रूझिंगसाठी गृहबंदर (home port) ठरत असून भविष्यात देशातील बहुतांश क्रूझ मुंबई बंदरातून रवाना होतील. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या पर्यटन विकास, रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे ते म्हणाले.

मुंबई - गोवा जलप्रवास सेवा २५ डिसेंबरपर्यंत

जलप्रवासाला चालना देण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने मुंबई ते गोवा दरम्यान ठिकठिकाणी ७२ जेट्टी विकसित करण्यात येत आहेत. या जेट्टींच्या निर्मितीनंतर ७०० किमी समुद्र किनाऱ्यावरुन कोकणात ठिकठिकाणी थांबे घेऊन गोव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होऊ शकेल. मुंबई ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेला जलप्रवास तथा क्रूझ साधारण २५ डिसेंबरपर्यंत सुरु होईल, अशी माहितीही पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली.

सप्ततारांकित सुविधांनी युक्त ६५४ केबिन्स, १७०० पर्यटक क्षमता

आज सुरु करण्यात आलेले कोस्टा निओ क्लासिका क्रूझ हे मुंबई - कोचिन - मालदिव दरम्यान प्रवास करणार आहे. मुंबई ते कोचिन दरम्यान क्रूझ प्रवास फक्त २९ हजार ८०० रुपयांचा असून त्यात ४ दिवस आणि ३ रात्री क्रूझचा आनंद घेता येणार आहे. तसेच मालदिवपर्यंतच्या ८ दिवस आणि ७ रात्रीच्या क्रूझचा दर हा ४५ हजार रुपये इतका आहे. मुंबईतून दर पंधरवड्यात रविवारी हे क्रूझ निघणार असून चालू सीझनमध्ये ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च २०१८ पर्यंत असेल. कोस्टा निओ क्लासिका या जहाजात ६५४ केबिन्स असून १ हजार ७०० पर्यटक प्रवास करु शकतात. या केबिन्समध्ये समुद्राचा व्ह्यू दिसणाऱ्या केबिन्स आणि स्वतंत्र बाल्कनी असलेल्या सुटचा समावेश आहे. हे जहाज कॅसिनो, चित्रपटगृहे, डिस्को, बॉलरुम, ग्रँड बार यांनी सुसज्ज आहे. मनोरंजनाच्या विविध सोयी - सुविधा जहाजावर उपलब्ध आहेत. जहाजावरील वेलनेस सेंटरमध्ये जिम, ट्रीटमेंट खोल्या, सोना आणि स्टीमसाठीच्या खोल्यांचाही समावेश आहे. आउटडोअर जॉगिंग ट्रॅक, ४ जॅकुझी आणि २ स्विमींग टँक आहेत. भव्य असे शॉपींग सेंटरही जहाजावर आहे. वाचकांसाठी उत्तम व वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश असलेले सुसज्ज ग्रंथालय आहे. आजच्या क्रूझ शुभारंभप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, कोस्टा क्रूझचे कॅप्टन स्टेफानो होकाचो, कस्टमच्या मुंबई झोनचे मुख्य आयुक्त राजीव टंडन, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड, कोस्टा क्रूझचे भारतातील प्रतिनिधी असलेल्या लोटस डेस्टिनेशनच्या व्यवस्थापकीय संचालक नलिनी गुप्ता आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा