NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

मनपा सभागृहात आत्मदहनाचा प्रयत्न

एमआयएमच्या तीन नगरसेवकांचा मनपा सभागृहात आत्मदहनाचा प्रयत्न
 
नांदेड (खास प्रतिनिधा) ब्रम्हपुरी भागातील विविध विकास कामे त्याच प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त करत एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी आज मनपाच्या सर्वसाधारण सभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यातील दोन नगरसेविका महिला आहेत. यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

नांदेड महापालिकेच्या हद्दीत२०१० साली ब्रम्हपुरी हा भाग समाविष्ट करण्यात आला. या नव्याने समाविष्ट झालेल्या भागासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला होता. २०११ साली हा निधी मंजूर झाल्यानंतर या कामाचे भूमिपुजन देखील झाले. मात्र नंतरच्या काळात हाच निधी अन्य विकासात्मक कामाकडे वर्ग केल्याने ब्रम्हपुरीच्या मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. ड्रेनेज लाईन जोडणे, पाणीपुरवठा, गटार योजना, नाली बांधकाम, रस्ते दुरुस्ती, शौचालय निर्मिती, घरकुलांचे बांधकाम यासाठी हा निधी मंजूर झाला. मात्र जवळपास सर्वच कामे अर्धवट राहिल्याने त्या भागातील नागरिकांच्या समस्या वरचेवर वाढत गेल्या. गेल्या सहा महिन्यापासून या प्रश्नावर एमआयएमच्या नगरसेवकांनी सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्याकडे प्रशासनाने लोकवर्गणीचा वाटा भरला नसल्याचे कारण सांगून दुर्लक्ष केले. 

आज सभागृहात हा प्रश्न एमआयएमच्या नगरसेवकांनी उचलून धरला त्यावेळी या प्रभाग क्र.२४ चे नगररसेवक अब्दुल हबीब अब्दुल रहीम, आासिया बेगम अब्दुल हबीब, बिपाशा बेगम सय्यद वलियोद्दीन या तिनही नगरसेवकांनी आयुक्तांनी व महापौरांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने बिस्लरी बॉटलीत भरुन आणलेले रॉकेल स्वतःच्या अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र माजी महापौर अब्दुल सत्तार, सरजितसिंघ गील, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी त्यांना वाचवून असा प्रकार करु नका, अशी विनंती केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. महापौर शैलजा स्वामी यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. यावेळी एमआयएमच्या सर्वच नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या धरला. पंधरा मिनिटांनी कामकाज सुरु झाल्यानंतर अब्दुल सत्तार, सरजितसिंघ गील, गाडीवाले, विरोधी पक्षनेते प्रमोद उर्फ बंडू खेडकर, दिपकसिंह रावत, बाळासाहेब देशमुख आदींनी ब्रम्हपुरीच्या भागातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली व या सर्व मागण्यांसंदर्भात आम्ही ब्रम्हपुरीवासियांच्या सोबत आहोत, अशा भावना व्यक्त केल्या. या प्रकारामुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. नगरसेवकांनी सर्वच भागातील प्रलंबित असलेल्या समस्यांना मार्गी लावण्याची मागणी केली.
टिप्पणी पोस्ट करा