NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २४ जून, २०१६

पीक कर्जाबाबत उमरी-बाजार येथे शेतकऱ्यांशी साधला खुला संवाद

बँकांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दयावी - किशोर तिवारी 

नांदेड(अनिल मादसवार)पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज द्या. बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक  दयावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती  स्वावलंबन  मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज उमरी-बाजार (ता. किनवट) येथे बोलताना दिले. पीक कर्ज वेळेत मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमरी-बाजार येथील शेतकऱ्यांशी श्री. तिवारी यांनी मेळाव्यात खुला संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पीक विम्याबाबत पिकांचे कापणी अहवाल चुकीचे दिले असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, किनवटचे तहसिलदार शिवाजी राठोड, माहूरचे तहसिलदार अशिष बिरादार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, नाबार्डचे श्री. धुर्वे यांच्यासह विविध बँकाचे वरीष्ठ अधिकारी तसेच कृषि, पशुसंवर्धन, सहकार आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. तिवारी यांनी उमरी-बाजार  येथील उपस्थित शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. गौरी तांडा येथील जिवला नाईक, खंबाळ्याचे संतोष राठोड यांनी उमरी-बाजार परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने म्हणणे मांडले. उमरी-बाजार व परिसरातील शेतकऱ्यांना कर्ज व त्याचे पूनर्गठन करताना येणाऱ्या अडचणीची माहिती दिली. 

मेळाव्यात शेतकऱ्यांशी खुला संवाद साधताना श्री. तिवारी म्हणाले की, कर्ज पुरवठा करताना बँकानाही अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामध्ये मराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थिती गेली सलग काही वर्षे शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड न झाल्याने बिकट आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या बॅकेला लवकरच पुरेसा पतपुरवठा केला जाणार आहे. जोपर्यंत शेतीतून चांगले उत्पन्न मिळत नाही तोवर शेतकरी कर्जाच्या गर्तेतून बाहेर पडणार नाही याची सरकारला जाणीव आहे. पण काही बँका सरकारच्या आदेशाकडेही दुर्लक्ष करीत आहेत. अशा बँकामध्ये शासकीय ठेवी न ठेवता त्या शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकाकडे वळविण्यात याव्यात असेही श्री. तिवारी म्हणाले. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पुढच्या वर्षीपासून धोरणात अमुलाग्र बदल करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगून श्री. तिवारी म्हणाले की, बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी सन्मानाची वागणूक दयावी. त्यांचा सातबारा कोरा आहे, जे शेतकरी नव्या कर्जासाठी पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्यात यावे. बँकेच्या पतपुरवठ्याबाबतची स्थिती शेतकऱ्यांना समजावून दयावी. त्यासाठी शेतकऱ्यांशी, ग्रामसमित्यांशी संवाद वाढावा. शेतकऱ्याला सावकाराच्या दारातून मुक्त करण्याचा प्रयत्न आहे. सर्व शेतकरी बँकेशी जोडले जावेत असा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही सत्तेत आहोत असेही त्यांनी सांगितले. 

पिकविम्याबाबतच्या अडचणीबाबत श्री. तिवारी यांनी पीक कापणीचे अहवाल चुकीचे दिले गेले असल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असेही सांगितले. यावेळी श्री. तिवारी यांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ प्रभावीपणे आणि सर्व घटकांना पारदर्शकपणे देण्यात यावा, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी करावी,  ग्रामीण व कृषि भागासाठीच्या फीडर पेपरेशन व रोहीत्र बसवण्याबाबत वेळेत कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधीत यंत्रणांना दिले. बॅकांनी कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नयेत. स्टॅम्प ड्युटी, गहाण खत, सर्च रिपोर्ट अशा चक्रात शेतकऱ्यांना अडकवू नये, त्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध व्हावे असेही निर्देश दिले. मेळाव्यात डॉ. भारुड यांनीही मार्गदर्शन केले. उमरी-बाजार परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माहूर पंचायत समितीत कर्ज पूनर्गठनाबाबत बैठक संपन्न 
-----------------------------------------
माहूर  येथे  उपविभागीय स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक श्री. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत श्री. तिवारी यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठीची एक लाख रुपयाची मदत श्रीमती मालाबाई  दिगांबर राठोड यांना धनादेश स्वरुपात सुपूर्द करण्यात आली. बैठकीत उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यासह विविध बँकाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक तसेच महसूल, कृषि, सहकार, आरोग्य, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

माहूर ग्रामीण रुग्णालयास तिवारी यांची भेट 
------------------------
सायंकाळी  श्री. तिवारी यांनी ग्रामीण रुग्णालय माहूरला भेट देऊन तेथेही पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती. रुग्णालयातील सुविधा व तेथील यंत्रणांची माहिती घेऊन श्री. तिवारी यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. माहूर तीर्थस्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात भावीक, पर्यटक येत असल्याने या रुग्णालयात अत्यावश्यक बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर सुरु करण्यात यावे या मागणीबाबत आपण पाठपुरावा करु असेही श्री. तिवारी यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा