NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

कल्याण निधीत मात्र पोलिसांचेही ‘कल्याण’

पोलीस निधीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा भ्रमनिरास, कल्याण निधीत मात्र पोलिसांचेही ‘कल्याण’ !
नांदेड(प्रतिनिधी)पोलीस कल्याण निधीच्या नावाखाली नांदेडच्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दबावतंत्राचा वापर करुन निधी जमा केला खरा, मात्र कार्यक्रमाचा दर्जा सुमार असल्याने रसिक, प्रेक्षकांची मात्र चांगलीच नाराजी संयोजकांना ओढवून घ्यावी लागली. पाचशे रुपयांच्या तिकीटामध्ये एखादा दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळाला असता, अशा प्रतिक्रिया साज और आवाजच्या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी व्यक्त केल्या. 

दाम दुप्पट योजनेतर्ंगत कल्याण निधी आणि पोलिसांचे मात्र चांगलेच भले झाले व दुष्काळात हा कार्यक्रम पोलिसांना आणि कल्याण निधीला चांगलाच फायद्याचा ठरल्याचे दिसून आले.नांदेडच्या पोलीस कल्याण निधीचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील सहा विभागामध्ये आयोजित करण्यात आला होता. याचा शेवट 26 जानेवारी रोजी रात्री नवामोंढा मैदानावर झाला. शहरातील वेगवेगळ्या व्यापारी तसेच धाकदपडशा करुन पोलिसांनी दबावतंत्राच्या आधारे स्वतःचे आणि कल्याण निधीचे मात्र कल्याण करुन घेतले.तीच तीच तिकीटे घेवून परत परत विकण्याचा उद्योग या मंडळींनी केला. विशेष म्हणजे 27 तारखेला एका डॉक्टरची पकडलेली गाडी व त्याला आकारण्यात आलेला दंड या तिकीटाच्या माध्यमातून वसुल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक सर्व कार्यक्रम 26 जानेवारी रोजीच संपले आहेत. नांदेड जिल्हा पोलीस कल्याण निधीसाठी मुंबईचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. 

जिल्ह्यातल्या किनवट, भोकर, देगलूर, लोहा व नांदेड शहरात हिंदी, मराठी गीतांच्या या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांची तिकीट विक्री करण्यात आली. सर्वच पोलीस ठाण्यांना तिकीट विक्रीचे लक्ष्य देण्यात आल्याने पोलिसांनी साम, दाम, दंड या नितीचा वापर करत तिकीट विक्री केली. नांदेड शहरात तर छोटे मोठे हॉटेल, पानठेले व बइरबारच्या मालकांना जबरदस्तीने तिकीटे देण्यात आली.वरिष्ठांची मर्जी रहावी यासाठी बहुतांश पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना तिकीट विक्रीचे आपले लक्ष्य पूर्ण केले. या तिकीट विक्रीतून पोलिसांच्या कल्याण निधीसाठी मोठी रक्कम जमा झाली खरी पण त्याचा वापर कसा होतो यावर सर्व काही अवलंबून आहे.पाचशे, दोनशे व शंभर रुपयाची तिकीटे विक्री करण्यात आली होती. 

मोठ्या प्रमाणावर तिकीट विक्री झाल्याने तसेच तिकीटासाठी मोठी रक्कम घेण्यात आल्याने कार्यक्रम चांगला होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती, परंतु नांदेड शहरातल्या नवामोंढा परिसरात सोमवारी झालेल्या कार्यक्रमाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईचा ऑर्केस्ट्रा बोलाविण्याऐवजी कमी पैशात नांदेडच्याच कलाकारांना संधी दिली असती तर ते अधिक उत्तम ठरले असते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला स्वतः पेालीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, तहसीलदार तसेच महसूल, पोलीस तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने या कार्यक्रमासाठी एक तासाचा जादा अवधी दिला होता.जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पाच ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी हा निधी वापरावा, असे संकेत आहेत पण अलिकडच्या काळात अधिकार्‍यांच्या इमारतीची रंगरंगोटी तसेच अन्य कामावरच कल्याण निधीचा वापर होत असल्याचे सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने मात्र सर्वच कार्यक्रम चांगल्या दर्जाचे झाल्याचा दावा केला आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करणार्‍या अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध न झाल्याने त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.
टिप्पणी पोस्ट करा