NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १२ मार्च, २०१४

निवडणूक प्रचाराचा आकडा

व्हिडीओ कॅमेरा सांगणार खर्चाचा निवडणूक प्रचाराचा आकडा

नांदेड(अनिल मादसवार)लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्‍या खर्चाची छाननी आणि पडताळणी करण्‍यासाठी व्हिडीओ चित्रिकरणाचा आधार घेतला जाणार असून उमेदवारांनी निवडणूक खर्चात सादर केलेला आकडा खरा की खोटा याची शहानिशा करण्यासाठी स्वतंत्रपणे मुल्‍यमापन केले जाईल, अशी माहिती लोकसभा निवडणूक प्रशिक्षण प्रकल्‍प प्रमुख तथा अप्‍पर जिल्‍हाधिकारी दिलीप स्‍वामी यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातील नियोजन भवनात बुधवारी (दि. 12) क्षेत्रीय अधिका-यांना प्रशिक्षण देण्‍यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, आयकर विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी राव, मिडीया कक्ष प्रमुख शशिमो‍हन नंदा यांची उपस्थिती होती.

निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रत्‍येक विधानसभा मतदार संघनिहाय वेगवेगळ्या पथकांची स्‍थापना करण्‍यात आली असून हे पथक उमेदवार, पक्ष व त्‍यांच्‍या समर्थकांच्‍या प्रत्‍येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवणार आहे. प्रचारसभा, कॉर्नर बैठका, रॅली, पदयात्रा, पोस्‍टर, बॅनरसारख्‍या प्रचाराचे सर्व साहित्‍य व त्‍यावर होणारा खर्च, प्रचारादरम्‍यान वापरण्‍यात येणारे वाहन, स्‍टार प्रचारकांवर होणारा खर्च अशा अनेक बाबींवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी व्हिडीओ चित्रिकरण करण्‍यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना भारत निवडणूक आयोगाने 70 लाखापर्यंत खर्च करण्‍याची मुभा दिली आहे. उमेदवारांना निवडणुकीदरम्‍यान होणारा खर्च दररोज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे सादर करणे बंधनकारक आहे. एखाद्या दिवशी काहीच खर्च झाला नाही तरीही खर्चाचे प्रपत्र निरंक खर्च असे दाखवून सादर करणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व्हीडीओ चित्रीकरण व त्याची पड़ताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यान्वीत असणार आहे. सुरुवातीला एक असणारे असे पथक नंतर वाढवले जातील. सभेतील खुर्च्या, शामियाने, वाहने, पाणी बाटली, अल्पोपहार तसेच अन्य माध्यमातून होणा-या खर्चावर पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. मालमत्ता विरुपन, मतदारांना प्रलोभन दाखवणे, लाच देणे, दारु किंवा अवैधारित्या कोणतेही साहित्य वाटप करणे, जातीय किंवा धार्मिक आवाहन करणे यासारख्या बाबींबर सर्व प्रकारचा प्रतिबंध राहणार आहे.

मतदानाच्या आदल्या आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडेल टार त्याचेही चित्रीकरण केले जाईल. निवडणूक प्रक्रियेदरम्यानच्या होणा-या प्रत्येक खर्चावर व्हिडिओ चित्रीकरण अवलोकन समितीमार्फत बारकाईने तपासले जाईल.आचारसंहिता भंगाची घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची नोंद घेऊन तात्काळ अहवाल देणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणात आचारसंहिता कक्षप्रमुख राजेंद्र खंदारे, अंकुश पिनाटे, पाचंगे यांनी सादरीकरणाव्‍दारे लेखा विषयक कामकाज प्रपत्र व अभिलेखे संदर्भात माहिती दिली.

मतमोजणी पर्यंत द्यावा लागणार खर्चाचा तपशिल

लोकप्रतिनिधी कायदा अधिनियम 1951 च्‍या कलम 77 (1) नुसार नामनिर्देशनापासून म्‍हणजे 19 मार्च ते निवडणूक निकाल घोषीत होईपर्यंत म्‍हणजे 16 मे 2014 पर्यंत खर्चाचे लेखे ठेवावे लागणार आहेत. निवडणूक कालावधी दरम्‍यान तीन वेळा खर्चाच्‍या तपशिलाची तपासणी करण्‍यात येणार आहे. उमेदवारांना 20 हजार रुपयांपर्यंतचा खर्च रोख स्‍वरुपात करण्‍याची मुभा असली तरी त्‍याची स्‍वतंत्र नोंद मात्र ठेवणे आवश्‍यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा