NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, १३ मार्च, २०१४

मोठा फटका

गारपिटीसह अवेळी पावसाने
जिल्‍ह्याच्‍या सर्वच भागांना मोठा फटका- जिल्‍हाधिका-यांचे केंद्रीय पथकापुढे सादरीकरण

नांदेड(अनिल मादसवार)पूरपरिस्थिती त्यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान आणि पाठोपाठ रब्बी हंगामातील सुमारे 73 हजार 019 हेक्टरला गारपिटीसह अवेळी पावसाने तडाखा दिल्याने नांदेड जिल्ह्याच्या सर्वच भागांना आणि विविध घटकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता मोठी आहे, अशी मांडणी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आज केंद्रीय पथकाच्या सदस्यांसमोर केली. नांदेड जिल्ह्यातील गारपीट व अवेळी झालेल्या पावसाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पाहणी पथकातील सदस्य अन्न सचिव एन. के. कश्मिरा हे आज नांदेड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शासकीय विश्रामगृहात सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची माहिती श्री. कश्मिरा यांच्यासमोर सादर केली.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ यांच्यासह उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, या पथकाच्या दौ-याचे समन्वयक उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी आदींची उपस्थिती होती.

सादरीकरण करताना जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले की, जिल्ह्यात 23 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान सर्वच तालुक्यांना गारपीटीसह अवेळी पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्यात या दरम्यान सुमारे शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गारपीट आणि अवेळी पावसाच्या तडाख्याने रब्बीच्या सुमारे 73 हजार 019 हेक्टरला फटका बसला आहे. यात गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, विविध तृणधान्ये, फळपिके यांच्यासह सारख्या नगदी पिकांना फटका बसला आहे. सततच्या पावसाने हाताशी आलेल्या उत्पादनाचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 886 गावांतील जनजीवनावरही या अवेळी पावसाचा प्रतिकुल परिणाम झाला आहे. पूरानेही या आधीच जिल्ह्यात नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ कृषी क्षेत्राला रब्बी हंगामही गमवावा लागला आहे. या आपत्तीत तीन व्यक्ती दगावल्या आहेत. तर शेतकऱ्यांच्या पशुधनाचीही गंभीर हानी झाली आहे. मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा करणाऱ्या पायाभूत सुविधेचेही नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे पुर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा कसोशीने प्रयत्न सुरु आहे. मदत व तातडीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

पाहणी पथकाचे सदस्य श्री. कश्मिरा यांनी पाहणीचा अहवाल लगेचच केंद्र सरकारकडे सादर केला जाणार असल्याचेही यावेळी सांगीतले.तत्पुर्वी केंद्रीय पथकाच्या या सदस्यांनी नांदेड जिल्ह्यात आगमन होताच अर्धापुर तालुक्यातील मेंढला खुर्द येथील गव्हाच्या आणि केळीच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सादरीकरण आणि विविध अहवालाची माहिती घेतल्यानंतर या पथकाने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यासह कंधार तालुक्यातील फुलवळ, मुंडेवाडी त्यानंतर वाखरवाडी येथे भेट दिली. बिलोली तालुक्यातील थडीसावळी, अदमपूर या परिसरातील घरांची झालेली पडझड आणि नुकसानीची या पथकाने पाहणी केली व माहिती घेतली. या दौऱ्यात पथकातील सदस्यांनी या विविध भागातील नागरीक, शेतकरी तसेच विविध घटकांचे म्हणणे ऐकून घेतले. या दौऱ्यात संबंधित तालुक्यातील महसूल, कृषी, पशूसंवर्धन तसेच आरोग्य आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही त्या-त्या परिसरातील विविध घटकांच्या नुकसानीची माहितीचा अहवाल सादर केला.
टिप्पणी पोस्ट करा