NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, १८ मार्च, २०१४

नामनिर्देशनपत्र आजपासून स्विकारणार

नामनिर्देशनपत्र आजपासून स्विकारणार
गुन्हे, संपत्ती व इंटरनेट खात्यांचीही माहिती द्यावी लागणार

नांदेड(अनिल मादसवार)लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2014 अंतर्गत नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यास उद्या बुधवार पासून (दि.19) प्रारंभ होणार आहे. उमेदवारांना त्यांची सर्व माहिती नमुना- 26 मध्ये भरुन देणे बंधनकारक असून गुन्हे, संपत्ती, बँक खाते तसेच इंटरनेटवरील सर्व व्यक्तिगत खात्यांचीही माहिती अर्जात दर्शविणे आवश्यक आहे. दि. 26 मार्च 2014 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार असून दि. 27 मार्च रोजी छाननी होईल. दि. 29 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटची तारीख आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी धीरजकुमार यांनी मिडीया सेंटर येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना ही माहिती दिली.

निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र सादर करताना मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ए आणि बी प्रपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. उमेदवारांचे वय 25 वर्षापेक्षा कमी नसावे, तो भारताचा नागरिक असावा आणि कोणत्याही मतदार यादीत त्यांचे नांव असणे बंधनकारक असेल. त्याचा पुरावा अर्जासोबत दाखल करावा लागेल. सरकारी नौकरीत किंवा सरकारी लाभाच्या पदाचा वापर करीत असेल अशा व्यक्तींना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 25 हजार रुपये अनामतपोटी भरावे लागतील. अनु. जाती किंवा अनु. जमातीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत त्यांचे जात प्रमाणपत्र जोडल्यास त्यांना 12 हजार पाचशे रुपये याप्रमाणे अनामत रक्कम भरावी लागेल. सदर अनामत भरल्याची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे बंधनकारक आहे. अपक्ष तसेच नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षाच्या उमेदवारास नामनिर्देशनपत्र दाखल करणार्‍यास प्रस्तावक म्हणून संबंधित मतदारसंघातील दहा तर मान्यता प्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारास एक प्रस्तावक असणे बंधनकारक आहे.

नामनिर्देशन पत्रासोबत असलेले विहित नमुन्यातील शपथपत्र 100 रुपयांच्या मुद्रांक पेपरवर सक्षम अधिकारी यांनी प्रामणित केलेले असले पाहिजे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसल्याचे शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी त्यांची व कुटुंबाची चल व अचल संपत्ती, व्यवसाय, शैक्षणिक अर्हता, दाखल झालेले गुन्हे, देश आणि परदेशातील सर्व प्रकारची बँक अथवा वित्त्ीय खाते, कर्ज, शासकीय किंवा निमशासकीय संस्थेची थकीत बाकी असा तपशिल नामनिर्देशनपत्रातील विहित केलेल्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी माहिती लागू नाही किंवा कोणतीही माहिती नाही, अशा ठिकाणी देखील ठळकपणे निरंक असे नमूद करणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्रातील कोणताही रकाना रिक्त ठेवता येणार नाही. असे आढळल्यास सदरील नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकार्‍यांकडून अवैध ठरवले जाऊ शकते. 29 मार्च रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. 

उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी बँकेत निवडणुकीसाठीचे स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चासाठीचा बँक खाते क्रमांक नामनिर्देशनपत्र सादर करतानाच कळविणे बंधनकारक आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराचे नांव कसे असावे याचा मराठी व इंग्रजी नमुना उमेदवाराने भरुन देणे आवश्यक आहे. सोशल मिडीयांच्या खात्यांचीही माहिती द्यावी लागणार

उमेदवारांच्या प्रचारासाठी खर्च होणार्‍या सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साधनांची माहिती व खर्चाचा तपशिल दाखल करणे भारत निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींचे ईमेल, सोशल मिडीया किंवा अन्य प्रकारच्या प्रचारक माध्यमाचे खाते असेल तर त्याची माहिती नामनिर्देशनपत्र दाखल करताना विहिती नमुन्यात देणे बंधनकारक आहे. भ्रमणध्वनीवरुन व्हाईस कॉल, एसएमएस, इंटरनेट खाते तसेच व्हिडीओ चित्रीकरण यांचाही खर्चाचा तपशिल द्यावा लागणार आहे. केवळ पाच जणांना प्रवेश


नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार व इतर चार अशा पाचच व्यक्तींना प्रवेश करता येईल. पाच पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असे मिडीया सेंटरच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच या निवडणुकीसाठी अर्ज भरणार्‍या उमेदवारांनी, निवडणूक आयोगाचे दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन अर्ज भरणे आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा